‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ असं म्हणतात. चिनमधील या वडिलांच्याबाबतीत ही म्हण तंतोतंत खरी ठरते. कारण अथक शोधाशोध केल्यानंतर अखेर तब्बल २४ वर्षानंतर त्यांना त्यांची हरवलेली मुलगी सापडली आहे. वॅंग मिंगक्विंग असं त्या वडिलांचं नाव आहे. १९९४ मध्ये त्यांची मुलगी हरवली होती. तेव्हापासून मिंगक्विंग आणि त्यांची पत्नी मुलीचा शोध घेत होते.

वॅंग मिंगक्विंग हे त्यावेळी फ्रूट स्टॉल चालवायचे. त्या दिवशी आपल्या तीन वर्षाच्या मुलीला एकटं ठेवून अगदी काही मिनिटांसाठी ते बाहेर गेले होते, पण तेवढ्या वेळातच त्यांची मुलगी बेपत्ता झाली. मुलीचा शोध कसा घ्यावा हेच त्या दांपत्याला समजत नव्हतं. त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली, सार्वजनिक ठिकाणी मुलीचे पोस्टर बनवून लावले, रूग्णालयामध्ये, पाळणाघरात ज्या ज्या ठिकाणी मुलगी असण्याची शक्यता त्यांना वाटली त्या सर्व ठिकाणी त्यांनी आपल्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

2015 मध्ये वॅंग यांनी टॅक्सी चालवण्यास सुरूवात केली. आपल्या हरवलेल्या मुलीबद्दल जास्तीतजास्त लोकांना माहिती देता येईल हा टॅक्सी चालवण्यामागचा त्यांचा उद्देश होता. टॅक्सीत बसणा-या प्रत्येक प्रवाशाला ते आपल्या मुलीविषयी विचारणा करायचे. 17 हजाराहून जास्त लोकांपर्यंत त्यांनी आपल्या मुलीविषयी माहिती पोहोचवली आणि त्यांनाही शक्य ती मदत करण्यास व इंटरनेटवर माहिती टाकण्यास सांगितलं. इतकंच नाही तर टॅक्सीमध्ये त्यांनी मुलीविषयी सर्व माहिती डिस्प्ले करून ठेवली होती. चिनमधील वृत्तसंस्था सीजीटीएनने याबाबत वृत्त दिलं आहे.

अखेर इंटरनेटवरील माहिती पाहून कॅंग यिंग ही तरूणी आपल्या वडिलांपर्यंत पोहोचली. 1 एप्रिल रोजी तिची डीएनए चाचणी घेण्यात आली आणि ती मिंगक्विंग यांची २४ वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी असल्याचं स्पष्ट झालं. सध्या या दांपत्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय.