काही दिवसांपुर्वी चीनने आपल्याकडीसल मुस्लिम लोकसंख्येला सुशिक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा नवे कॅम्प सुरु केले असल्याची बातमी आली होती. पण या कॅम्पमध्ये राहत असलेल्या एका मुस्लिम व्यक्तीने धक्कादायक माहिती उघड केली आहे, ज्यामुळे बिजिंगमधील मुस्लिमांची दयनीय अवस्था जगासमोर आली आहे. कायरत समरकंद सांगतात, की आपली चूक एवढीच होती की आपण मुस्लिम आहोत आणि शेजारी राष्ट्र कझाकिस्तानमध्ये गेलो. फक्त याच आधारे आपल्याला ताब्यात घेण्यात आलं आणि तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली. यानंतर नोव्हेंबर महिन्यात चीनमधील शिनजियांग येथे तीन महिन्यांसाठी ‘रिएज्यूकेशन कॅम्प’ मध्ये पाठवण्यात आलं.

प्रकरण फक्त इतक्यावरच संपलं नाही. एका मुलाखतीत समरकंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा वारंवार अपमान करण्यात आला. यावेळी ब्रेनवॉश करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दिवसभरात तासन् तास कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी, धोरण वाचण्याची जबरदस्ती करण्यात आली. एवढ्यावरच मन भरलं नाही म्हणून प्रत्येक दिवशी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा धन्यवाद मानणाऱ्या आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या घोषणा देण्यात सांगण्यात आल्या.

“जे या नियमांचं पालन करत नव्हते किंवा करण्यास नकार देत असत, वाद घालत किंवा शिकवण्यासाठी उशिरा येत त्यांना तब्बल १२ तास हात पाय बांधून कोंडून ठेवलं जात असे”, असं समरकंद यांनी सांगितलं आहे. याव्यतिरिक्त नियमांचं पालन न करणाऱ्यांचं तोंड पाण्यात बुडवलं जात असे.

चीनमधील शिनजियांग प्रांताची लोकसंख्या २ कोटी १० लाख असून यामध्ये जवळपास १ कोटी १० लाख मुस्लिम आहेत. ज्या मुस्लिमांना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे.

चीन अनेकदा शिनजियांगमध्ये राहत असलेल्या उइगर मुस्लिमांवर दहशतवाद पसरवल्याचा आरोप करत बंदी आणत असतं. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात शिनजियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी उइगर मुस्लिमांना चेतावणी देत, कुराण तसंच नमाज पठण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींसहित सर्व धार्मिक गोष्टी सोपवल्या नाही तर शिक्षेस पात्र असतील असं सांगितलं होतं.

समरकंद यांनी सांगितल्यानुसार, करामे गावात एकाच कॅम्पमध्ये ५ हजार ७०० लोकांना बंदी करुन ठेवण्यात आलं आहे. यामधील जवळपास सर्व लोक उइगर मुस्लिम आहेत. इतकंच नाही तर २०० जण धार्मिक दहशतवादाला खतपाणी घातल्याच्या आरोपाखाली संशयित आहेत. याशिवाय अनेकांनी आत्महत्या केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

या कॅम्पमध्ये राहत असलेल्या उमर बेकाली यांनी सांगितलं आहे की, “या कॅम्पमध्ये अत्यंत खराब दर्जाचं अन्न दिलं जातं. मांस तर अजिबातच दिलं जात नाही. याशिवाय अन्नातून विषबाधा होण्याची खूप शक्यता असते. येथे राहणाऱ्या अनेकांना शिक्षा म्हणून डुकराचं मासं खाण्याची सक्ती केली जाते. तसंच धार्मिक दहशतवादाच्या आरोपाखाली दारुदेखील पाजली जाते”.

बेकाली मूळचे कझाकिस्तानचे असून, शिनजियांग प्रांतातील एका टुरिझम कंपनीत काम करत होते. मार्च २०१७ मध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सलग चार दिवस त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना अजिबात झोपू दिलं नाही. यानंतर त्यांना सात महिन्यांसाठी पोलीस कोठडीत आणि नंतर २० दिवसांसाठी रिएज्युकेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं. यावेळी त्यांना वकिलांशीही संपर्क साधू दिला नाही. सध्या बेकाली आणि समरकंद दोघेही कझाकिस्तानमध्ये राहत असून, आपल्याला सामोरं जावी लागलेली भयाण परिस्थिती जगासमोर मांडली आहे.

कोण आहे उइगर मुस्लिम
– उइगर हे तुर्की मुस्लिम आहेत. शिंजियांग प्रांतात त्यांची संख्या जास्त आहे.
– उइगर मुस्लिम स्वतःला चीनी वंशाचे मानत नाहीत. त्यांची भाषा तुर्की आहे.
– चीन, पाकिस्तानवर उइगर मुस्लिमांना चिथावणी देण्याचा आरोप करत आले आहे.
– चीन सरकारचा दावा आहे, की पाकिस्तानातील काही भागात उइगर मुस्लिमांना दहशतवादी कारवायांची ट्रेनिंग दिली जाते.