News Flash

चीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र!

हे मानवनिर्मित चंद्र पृथ्वीपासून अवघ्या ५०० किलोमीटरवर असतील

खरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे

चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी त्यांनी लावलेले भन्नाट शोध. जगभरातील बाजारपेठांमध्ये ‘मेड इन चायना’ टॅग असणाऱ्या एकाहून एक भन्नाट वस्तू हातोहात विकल्या जातात. मात्र सध्या जगभरात चर्चा सुरु आहे चीनच्या आणखीन एका भन्नाट कल्पनेची. ही कल्पना म्हणजे आकाशात तीन मानवनिर्मित चंद्र सोडण्याची तयारी चीनने सुरु केली आहे.

चीनमधील चेंगडू शहरामधील रस्त्यांवरील दिव्यांच्या जागी या मानवनिर्मित चंद्राचा वापर करण्याच्या वैज्ञानिकांचा मानस आहे. हे तीन चंद्र नैसर्गिक चंद्रापेक्षा आठ पटींने अधिक तेजस्वी असतील अशी माहिती वू चुनफेंग यांनी दिली. वू चुनफेंग हे चीनमधील सिचुआन प्रांतातील ‘चेंगडू एरोस्पेस सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टम रिसर्च इंस्टिट्यूट कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष आहेत. ही संस्था आकाश संशोधन क्षेत्रात काम करते.

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असलेल्या ‘पिपल्स डेली’नं दिलेल्या वृत्तानुसार या चंद्रांमुळे चेंगडू शहरामधील १० ते ८० किलोमीटरचा परिसराला रात्रीच्या वेळी प्रकाश मिळेल. या प्रकल्पामुळे चेंगडू शहरामध्ये रात्रदिव्यांवर होणाऱ्या एकूण खर्चामधून दरवर्षी २४ कोटी रुपये वाचतील असे चुनफेंग यांनी सांगितले आहे. पुढील दोन वर्षांमध्ये म्हणजेच २०२० पर्यंत चीन हे तीन कृत्रिम चंद्र अाकाशात सोडणार असल्याचे ‘पिपल्स डेली’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

असे असतील हे चंद्र

तांत्रिक भाषेत सांगायचे तर हे तीन मानवनिर्मित कृत्रिम चंद्र म्हणजे उपग्रह असतील. या उपग्रहांवर आरसश्यासारख्या परावर्तित करणाऱ्या वस्तूपासून बनवलेले आवरण लावलेले असेल. ज्याप्रमाणे नैसर्गिक चंद्रावर पडणार प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर पडतो त्याचप्रमाणे या उपग्रहांच्या पृष्ठभागावर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर पडेल. पुढील दोन वर्षात हे चेंगडू शहरावर जमीनीपासून ५०० किलोमीटरवर स्थिरावले जातील. खरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे तर हे चंद्र अवघ्या ५०० किलोमीटरवर असल्याने ते नैसर्गिक चंद्रापेक्षा अधिक प्रकाशित दिसतील. हे चंद्र आकाशात स्थिरावल्यानंतर चेंगडू शहराला पथदिव्यांची गरजच भासणार नाही.

अनेकांचा विरोध

कृत्रिम चंद्र पाठवण्याच्या या मोहिमेला अनेकांनी विरोध केला आहे. या चंद्रांचा दुष्परिणाम अधिक असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. या चंद्रांमुळे रात्री कृत्रिम प्रकाश जमिनीवर पडल्याने प्राण्यांना त्रास होईल. त्याचप्रमाणे अनेक खगोलीय घटना पाहताना या चंद्रांमुळे अडथळा निर्माण होईल असे अनेकांचे म्हणणे आहे. या आधी मागील वर्षीही रशियाने अशाप्रकारे कृत्रिम चंद्र आकाशात सोडण्याचा प्रयत्न केला होता तो पूर्णपणे फसला होता. त्यामुळे चीनने अशाप्रकारे खरोखरच हे चंद्र आकाशात सोडण्यात यश मिळवले तर तो आकाश संशोधन क्षेत्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 11:09 am

Web Title: china plans to launch a second moon into the sky
Next Stories
1 सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात
2 नोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार
3 मॉर्निंग बुलेटिन : वाचा महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X