चिलखती वाहनातून सुरक्षा जवान सीमेवर

हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये लोकशाहीवाद्यांची निदर्शने चिरडून टाकण्यासाठी चीनने त्यांची सशस्त्र सुरक्षा दले सीमेवर आणली आहेत, चिलखती वाहनांतून हे जवान आले असून  ही वाहने शेनझेन शहरातील क्रीडा संकुलात लावण्यात आली आहेत. हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शनांनी तेथील चीन समर्थक राजवटीस मेटाकुटीस आणले असून चीनने ते आंदोलन चिरडण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

चीनने सुरक्षा दले तैनात केली असल्याच्या वृत्ताला अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. मॅक्सर्स वर्ल्डव्ह्य़ूच्या छायाचित्रात किमान ५०० हून अधिक वाहने शेनझेन येथील फुटबॉल स्टेडियमवर दिसत आहेत. गेले दोन महिने हाँगकाँगमध्ये रोज निदर्शने सुरू आहेत. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ही तयारी निदर्शने चिरडण्यासाठी केलेली नाही, त्याचा हाँगकाँगमधील निदर्शनांशी काही संबंध नाही. अमेरिकेच्या गुप्तचरांनीही चीनने सुरक्षा दले हाँगकाँग नजीकच्या सीमेवर आणल्याचे म्हटले आहे.

हाँगकाँग येथील विमानतळावर निदर्शने करणारे लोक हे दहशतवादीच आहेत, असा आरोप चीनने नुकताच केला होता. हाँगकाँगमधील निदर्शनांचे उग्र रूप पाहिले तर तो प्रदेश आता गुंतवणूकदारांचे आकर्षण राहणार नाही अशी चिन्हे आहेत. कारण तेथील सुरक्षितता व स्थिरता धोक्यात आली आहे.

तेथील लोकसंख्या ही ७३ लाख असून बावीस वर्षे ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले हाँगकाँग चीनच्या ताब्यात देण्यात आले होते. बीजिंगमधील तिआनमेन चौकात तीस वर्षांपूर्वी तेथील सरकारने लोकशाहीवाद्यांचे हत्याकांड केले होते. त्यामुळे हाँगकाँगमधील परिस्थिती चीन त्याच प्रकारे हाताळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण त्याआधीचा प्रयत्न म्हणून निदर्शकांबाबत सामान्य लोकांमध्ये रोष निर्माण करण्यासाठी चीन सरकारने हाँगकाँगमधील निदर्शकांत त्यांचे छुपे समर्थक सोडले असून ते आणखी हिंसक कारवायांना उत्तेजन देत आहेत. त्यामुळे लोकशाहीवादी निदर्शनांना लोकांची सहानुभूती कमी होण्याची शक्यता आहे.

अमेरिकी जहाजांना चीनने परवानगी नाकारली

वॉशिंग्टन : अमेरिकी नौदलाच्या दोन जहाजांना हाँगकाँगला भेट देण्याची परवानगी चीनने नाकारली आहे. अमेरिकी पॅसिफिक नौदल चमूचे कमोडोर नॅट ख्रिस्तनसन यांनी सांगितले की, ‘यूएसएस ग्रीन बे’ हे  जहाज हाँगकाँगला १७ ऑगस्ट रोजी भेट देणार होते तर ‘यूएसएस लेक एरी’ हे जहाज सप्टेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये येणार होते पण चीनने परवानगी नाकारली आहे त्याचे कारण समजू शकले नाही. यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये अमेरिकी नौदलाच्या ‘यूएसएस ब्लू रिज’ या जहाजाने हाँगकाँगला भेट दिली होती.