गलवान खोऱ्यातून चीनचे सैन्य एक ते दोन किलोमीटर मागे हटले आहे. त्यानंतर आता चीनकडून यावर पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळील सैनिक प्रभावी उपायोजना करत आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी म्हटले आहे.

कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.

आणखी वाचा- मोदींच्या लेह भेटीनंतर ४८ तासांमध्ये परिस्थितीत सुधारणा

आज सकाळी पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळून चीनच्या सैनिकांनी तंबू आणि अन्य बांधकाम हटवले. गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या भागातून चिनी सैन्य मागे जात आहे यावर झाओ लिजियन यांना विचारले असता ते म्हणाले की, “तणाव कमी करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळील सैनिकांकडून उपायोजना केल्या जात आहेत. भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये ३० जून रोजी कमांडर स्तरावरची चर्चा झाली. त्यानुसार दोन्ही बाजूंमध्ये जे ठरलंय, त्यावर अंमलबजावणी केली जाईल”.

आणखी वाचा- चीनने सैन्य मागे घेण्यामागे अजित डोवाल? रविवारी फोनवर चर्चा, सोमवारी माघार

“तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु राहील” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ठरल्यानुसार चीनकडून माघार घेतली जात आहे. ३० जून रोजी दोन्ही देशांमधये लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वेगाने आणि टप्याटप्याने तणाव कमी करण्यासाठी पावले उचलण्यावर एकमत झाले होते.