चीनचा समावेश जगातील सामर्थ्यशाली सैन्यांमध्ये केला जातो. चीनच्या सैन्यात तब्बल २३ लाख सैनिक आहेत. मात्र चीनकडून सैन्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कपात करण्यात येणार आहे. चीनकडून सैन्याची पुनर्गठन प्रक्रिया करण्यात येणार असून त्यामुळे चिनी सैन्याचा आकडा १० लाखांपर्यंत आणला जाणार आहे. चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ‘पीएलए डेली’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. चीनच्या पीपल्स आर्मीमधून सैनिकांची संख्या कमी केली जाणार असून त्याऐवजी क्षेपणास्त्रे, दारुगोळा यांच्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे.

चिनी समाज माध्यम असलेल्या ‘वीचॅट’वर पीएलए डेली वृत्तपत्राचे खाते असलेल्या जुन झेंगपिंग स्टुडिओवर सैन्याने ढाचा सुधारण्यासंदर्भात एक लेख लिहिला आहे. ‘सुधारणांनंतर विशाल सैन्य क्षमता असलेल्या ढाच्यात बदल करण्यात येतील. चीनच्या सामारिक गरजा लक्षात घेऊन सैन्याच्या ढाच्यात बदल केले जाणार आहेत,’ असे लेखात नमूद करण्यात आले आहे. ‘याआधी चीनकडून जमिनीवर केले जाणारे युद्ध आणि अंतर्गत सुरक्षा या मुद्यांकडे लक्ष केंद्रीत केले जात होते. मात्र आता यामध्ये मुलभूत बदल केले जाणार आहेत,’ असे पीएलए डेलीने लेखात म्हटले आहे.

‘पहिल्यांदाच चिनी सैन्यातील सैनिकांची संख्या घटवून १० लाखांच्या खाली आणली जाणार आहे. नव्या ढाच्यानुसार, स्ट्रॅटर्जिक सपोर्ट फोर्स, नौदल, रॉकेट फोर्समधील सैन्याचे प्रमाण वाढवले जाणार आहे. तर चिनी हवाई दलातील सैनिकांची संख्या पूर्वी इतकीच ठेवण्यात आली आहे,’ असे पीएलए डेलीमधील लेखात नमूद करण्यात आले आहे. चिनी संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये सैन्यात ८.५० लाख युद्ध सैनिक होते. मात्र सध्या चिनी सैन्याचा नेमका आकडा किती, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. याआधी चिनी सैन्यातून तीन लाख सैनिक कमी करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी दिली होती.