चीनच्या ब्रिटनमधील राजदूतांचे स्पष्टीकरण

लंडन : चीनने हाँगकाँगबाबत बघ्याची भूमिका घेतली नसून हाँगकाँगमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास तातडीने उपाय करून परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल, असे चीनच्या ब्रिटनमधील राजदूतांनी लंडन येथे गुरुवारी स्पष्ट केले.

हाँगकाँगमधील विशेष प्रशासकीय विभागाच्या सरकारकडून तेथील स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास केंद्र सरकार बघ्याची भूमिका न घेता कारवाई करेल. तेथील अस्वस्थता दूर करण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. तसेच अधिकारही आहेत, असे लिऊ शिओमिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हाँगकाँगच्या सीमेवर शेनझेन येथील मैदानावर चिनी लष्कराचे हजारो जवान परेड करतानाचे छायाचित्र गुरुवारी प्रसिद्ध झाले आहे. तसेच शस्त्रास्त्र पुरवठा करणारे अनेक ट्रकही या जवानांच्या तुकडय़ांजवळच उभे आहेत.

हाँगकाँगमधील स्थितीवर शांततेत तोडगा निघेल अशी आमची खात्री आहे, मात्र आम्ही कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास तयार आहोत, असे सांगतानाच लिऊ शिओमिंग यांनी  परदेशी  हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त केली.

हस्तक्षेप टाळावा

ब्रिटनमधील अनेक राजकीय नेत्यांना हाँगकाँग हा ब्रिटनच्या प्रशासनाचाच भाग असल्याचे वाटते. ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी हाँगकाँगमधील प्रश्न अतिशय खबरदारी घेऊन हाताळावा. शक्यतो हस्तक्षेप करू शये, असेही लिऊ शिओमिंग यांनी म्हटले आहे.

माजी पत्रकार चीनमध्ये स्थानबद्ध

बीजिंग : चीनची ‘ऑनलाइन सेन्सॉरशिप’ नष्ट करण्यासाठी अमेरिकेने मदत करावी, असे आवाहन केल्यामुळे २०१४ साली प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या एका माजी पत्रकाराला चीनने स्थानबद्ध केले आहे. ‘भांडण केल्याबद्दल आणि उपद्रवासाठी भडकावल्याबद्दल’ पोलिसांनी झांग जिअलाँग यांना मंगळवारी ताब्यात घेतले, असे या वृत्तसंस्थेने पाहिलेल्या डिटेन्शन नोटीसमध्ये म्हटले आहे. चीनच्या अपारदर्शक यंत्रणेत मानवाधिकार कायकर्ते आणि विरोधी विचाराच्या लोकांना स्थानबद्ध करण्यासाठी अशा प्रकारचा संदिग्ध आरोप नेहमीच केला जातो.