पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अंत्यत बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. यापूर्वी कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत जे ठरले होते, तो शब्द चीनने फिरवला होता. त्यामुळे १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.

चीनने गलवानमध्येच नव्हे तर हॉटस्प्रिंग, पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी केली आहे. इथे फिंगर फोरपर्यंत चिनी सैन्य आहे. हा संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. त्यामुळे चिनी सैन्याने फिंगर आठपर्यंत माघारी फिरावे ही भारताची मुख्य मागणी आहे. चीनच्या दबावाच्याखेळीसमोर न झुकता भारताने चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य तैनाती केली आहे. गलवानमध्ये चीनच्या कुठल्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारताने टी-९० भीष्ण रणगाडेही तयार ठेवले आहेत.