चीनमधील लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शकावर २६ दशलक्ष डॉलरच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या दिग्दर्शकाला सात अपत्ये असून हा चीनमधील अत्यंत कडक अशा कुटुंब नियोजन कायद्याचा भंग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.‘रेझ द रेड लॅन्टर्न’ आणि ‘रेड सोरघम’ या चित्रपटांचा निर्माता झांग यीमोयू यांची कुटुंब नियोजन अधिकारी चौकशी करीत आहेत, असे एका दैनिकाच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. या दिग्दर्शकाला सात अपत्ये असून त्यांना १६० दशलक्ष युऑनच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नियमाचे उल्लंघन केल्याचा दंड संबंधिताची मिळकत आणि त्यामध्ये किती अपत्यांचा समावेश आहे त्या दृष्टिकोनातून मोजण्यात आली आहे. झांग यांच्या अनेक चित्रपटांवर यापूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निकटचे संबंध असल्याने त्यांना २००८ च्या ऑलिम्पिक महोत्सवाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याचे काम देण्यात आले होते.
झांग यांचे अनेक महिलांशी संबंध होते, असे एका वृत्तपत्राने म्हटले असले तरी त्या महिलांपासून झालेल्या अपत्यांचा जन्म नेमका कोठे झाला ते निश्चित करण्यात आलेले नाही.