चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून द्विपक्षीय संबंधांना नवा आयाम

चीन आणि भारताने जुने मतभेद दूर करून द्विपक्षीय संबंधामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. जर दोन्ही देशांमध्ये परस्पर राजकीय विश्वास निर्माण झाला तर, हिमालयही त्यांच्यामधील मैत्रीला दूर करू शकणार नाही, असा विश्वास चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी व्यक्त केला आहे. पेईचिंगमध्ये आयोजित १३व्या एनपीसीच्या वार्षिक अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत वांग बोलत होते. या वेळी त्यांनी भारत-चीन संबंधाबाबत आपली भूमिका विशद केली.

चीनच्या राजकीय पटलावर काही मोठे बदल चालू आठवडय़ामध्ये अपेक्षित आहेत. राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग पुन्हा निवडणूक लढवण्यासंदर्भातील प्रस्ताव संसेदत मंजूर होण्याची अपेक्षा आहे. या पाश्र्वभूमीवर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ पत्रकार परिषद घेत चीनच्या परराष्ट्र धोरणाचे ‘नवे पर्व’ कसे सुरू झाले याची माहिती दिली.

२०१७ मध्ये ७३ दिवस वादाचा विषय राहिलेल्या डोकलामसह इतर अनेक विषयांमध्ये आडमुठे धोरण राहिलेला चीन भारतासोबत असलेल्या आपल्या संबंधाकडे कसे पाहतो असे विचारल्यानंतर त्यांनी काही परीक्षा आणि अडथळे सोडल्यास चीन आणि भारताचे संबंध उत्तम राहिले असल्याचे वांग यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती मागील दशकभरात मोठय़ा प्रमाणात बदलली आहे. चीन तसेच भारताला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक दुसऱ्यास समर्थन करण्यासाठी तसेच परस्परविरोधी असलेला संशय कमी करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे नवीन वर्षांमध्ये द्विपक्षीय संबंधावर प्रथमच चर्चा करताना परराष्ट्रमंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

चीन आणि भारत संबंधामध्ये परस्पर विश्वास महत्त्वाचा आहे. हा राजकीय विश्वास कोणत्याही स्थितीमध्ये, अगदी हिमालयही आमच्या मित्रवत संबंधांना थांबवू शकत नसल्याचे सांगत त्यांनी दोन्ही देशाच्या संबंधांना नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.

ड्रॅगन आणि हत्तीने वाद घालू नये!

दोन्ही देशांनी आपले परस्पर मतभेद दूर करणे आवश्यक आहे. चीन आपल्या अधिकार आणि कायदेशीर बाबींचे हित कायम ठेवून भारतासोबतचे संबंध आणखी वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे. चीन आणि भारताच्या नेत्यांनी आपल्या भविष्यातील सौहार्दाच्या संबंधासाठी धोरणात्मक दृष्टिकोन समोर ठेवण्याची गरज आहे. चीनच्या ड्रॅगन आणि भारताच्या हत्तीने आपआपसामध्ये वाद न करता हातामध्ये हात घेत पुढे पावले टाकणे आवश्यक आहे. जर भारत आणि चीन एकत्र आले तर एक आणि एक मिळून दोनच्या ऐवजी एक आणि एक असे अकरा होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.