सिक्किम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून भारत – चीनमधील संबंधांतील तणावात कमालीची वाढ झाली आहे. त्यात चीनकडून भारताला वारंवार धमकावले जात आहे. भारताची अवस्था १९६२ पेक्षाही वाईट करू, अशी धमकी देणाऱ्या चीनने पुन्हा दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून १९६२ साली युद्धाच्या आधी प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हवाला देत भारताला धमकावले आहे. आताच्या परिस्थितीत युद्ध झालेच तर भारतीय सैनिकच मोठ्या संख्येने मारले जातील, असे त्यात म्हटले आहे.

१९६२ मध्ये ‘इफ धिस कॅन बी टॉलरेटेड, व्हॉट कान्ट’ या शिर्षकाखाली संपादकीय प्रसिद्ध झाले होते. भारतीय सैनिकांकडून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. भारतीय सैनिक चिनच्या हद्दीत घुसखोरी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. जर असाच प्रकार सुरु राहिला तर भारतीय सैनिकच मोठ्या संख्येने मारले जातील, असा इशारा या संपादकीयमधून देण्यात आला होता. भारत-चीनची सीमा अनधिकृत असल्याचाही दावा त्यात करण्यात आला होता. त्याचाच हवाला देत चीनने पुन्हा भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. आताच्या परिस्थितीत युद्ध झाल्यास भारतीय सैनिकच मोठ्या संख्येने मारले जातील, अशी धमकी चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून देण्यात आली आहे.

याआधीही चीनने अशाच प्रकारे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. १९६२ पेक्षा यावेळी भारताची वाईट अवस्था करू, असे चीनने म्हटले होते. सिक्किम परिसरात सैन्यबळाचा वापर करण्याचा विचार भारत करणार असेल आणि पाकिस्तान, चीनविरोधात एकाच वेळी युद्धाची तयारी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत असेल तर चिनी सैन्याला कमी समजू नये, त्यांची ताकद सहजपणे घेतली जाऊ नये, असे चीनने म्हटले होते. १९६२ आणि आताचा भारत पूर्ण वेगळा असल्याचे भारताकडून सांगितले जात आहे. त्यांचे म्हणणे योग्यच आहे. पण युद्ध झालेच तर भारतालाच सर्वाधिक नुकसान सोसावे लागेल, असेही चीनने म्हटले होते.