पूर्व लडाखमध्ये भारत व चीन दरम्यानच्या निर्धारित नसलेल्या सीमेनजीक चीनची काही हेलिकॉप्टर्स उडत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवडय़ात पँगाँग तलावानजीक दोन्ही बाजूंच्या सुमारे २५० सैनिकांमध्ये भीषण चकमक उडाल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

गेल्या मंगळवारी सायंकाळी दोन्ही बाजूंच्या फौजांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर या भागातील परिस्थती तणावाची होती. दुसऱ्या दिवशी स्थानिक कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी हा तणाव संपुष्टात आणण्याचे मान्य केले होते.

या संघर्षांनंतर, किमान दोन वेळा चीनचे लष्करी हेलिकॉप्टर्स प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ उडत असल्याचे नजरेला पडले. यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानांच्या एका ताफ्यानेही या भागात उड्डाण केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोन्ही सैन्यांदरम्यानचा तणाव आणि चीनचा आक्रमक पवित्रा या पार्श्वभूमीवर या भागात उड्डाणासाठी एसयू-३० जेट विमाने पाठवण्यात आलीत काय, याबाबत अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आले नाही. भांडणानंतर दोन्ही बाजूंनी या ठिकाणी अतिरिक्त फौजा पाठवल्या आहेत.

चिनी लष्कराचे हेलिकॉप्टर्स सीमेपलीकडील चीनकडील बाजूला नेहमीच उड्डाण करतात, तर भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर्सही आपल्या हद्दीत उडतात, असे सूत्रांनी सांगितले.

५ मे रोजी झालेल्या संघर्षांत, भारतीय व चिनी लष्कराच्या सैनिकांची पँगाँग तलाव्याच्या उत्तर किनाऱ्यानजीक चकमक उडाली होती व त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली होती. दोन्ही बाजूंचे बरेच सैनिक यात जखमी झाले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये पँगाँग तलावाभोवती झालेल्या अशाच घटनेनंतर, दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांना ठोसे लगावल्याची ही पहिलीच घटना होती.