24 January 2021

News Flash

भारतीय हद्दीतच लष्कराला अटकाव

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाळायचे सर्व आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवून लेह-लडाख क्षेत्रात दादागिरी करणाऱ्या चिनी लष्कराची मजल आता

| August 5, 2013 02:03 am

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाळायचे सर्व आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवून लेह-लडाख क्षेत्रात दादागिरी करणाऱ्या चिनी लष्कराची मजल आता या ठिकाणी भारतीय लष्कराला गस्त घालण्यास नकार देण्यापर्यंत गेली आहे. गेल्याच आठवडय़ात ही घटना घडली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १४ किमी. आत भारतीय हद्दीत असलेल्या ट्रेड जंक्शन या ठिकाणावर गस्त घालत असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीला चिनी लष्कराने चक्क अटकाव केला.
दौलतबेग ओल्डी या तळावर घुसखोरी करून तब्बल तीन आठवडे मुक्काम ठोकण्याचा उद्दामपणा चिनी लष्कराने एप्रिलमध्ये केला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा चिनी लष्कराने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. चिनी लष्कराने घुसखोरी केली की सीमेवरील त्या भागात तैनात असलेल्या दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही बाब निदर्शनास आणून द्यायची आणि भारतीय अधिकाऱ्यांची पाठ फिरली की पुन्हा घुसखोरी करायची असा नित्य प्रकार सुरू आहे. गेल्याच आठवडय़ात चिनी लष्कराने तर भारतीय हद्दीतच असलेल्या ठिकाणावर गस्त घालत असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीलाच अटकाव केला. ‘हा भाग चिनी आधिपत्याखाली येतो, येथून तुम्ही परत जा’, असा सूचनाफलकच गस्तीवरील भारतीय तुकडीला दाखवण्यात आला. ट्रेड जंक्शन या ठाण्याजवळ हा प्रकार घडला. या ठिकाणानजीकच चिनी लष्कराने एक टेहळणी मनोरा उभारला आहे. याच भागात चिनी लष्कराच्या गाडय़ाही काही दिवसांपासून फिरत होत्या. त्याला भारतीय लष्कराने तातडीने विरोध करीत हा प्रकार बंद पाडला. हे दोन्ही मुद्दे दोन्ही बाजूंकडील लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला जाणार आहेत.
दरम्यान, मागील बैठकीत भारतीय लष्कराने चिनी लष्कराकडून वारंवार होत असलेले घुसखोरीचे प्रकार चिनी नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिले होते. १६ ते २६ जुलै या कालावधीत चिनी जवानांनी तब्बल पाच वेळा घुसखोरी केली होती. चुमार, डेमचोक आणि देप्सांग या भागात ही घुसखोरी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2013 2:03 am

Web Title: chinese troops stop army from patrolling in indian territory
Next Stories
1 संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन
2 अमेरिकेत सतर्कता
3 महागाई भत्त्यात वाढ?
Just Now!
X