छोटा शकीलचा विश्वासू हस्तक आणि दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करणाऱ्या फारुख देवडीवालाची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनेच त्याचा काटा काढल्याची चर्चा असून फारुखच्या हत्येचा व्हिडिओ गुन्हेगारी जगतात व्हायरल झाल्याचे समजते. मुंबई पोलिसांकडून या वृत्ताबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

फारुख देवडीवाला हा छोटा शकीलचा विश्वासू हस्तक म्हणून अंडरवर्ल्डमध्ये ओळखला जातो. शकीलच्या इशाऱ्यावरच तो भारतात दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करत होता. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्याचे काम त्याच्याकडे सोपवण्यात आले होते. देवडीवाला हा मूळचा गुजरातचा असून तो काही काळ मुंबईतही वास्तव्यास होता. गुजरात दंगलीनंतर २ किलो आरडीएक्स पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. २००३ मध्ये तो देशाबाहेर पळाला होता.

काही महिन्यांपूर्वी फारुख देवडीवालाला दुबई पोलिसांनी अटक केली होती. संयुक्त अरब अमिरातीसोबत भारताचा प्रत्यार्पण करार असल्याने पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरु केले. मात्र, छोटा शकीलच्या निकटवर्तीयाचा ताबा भारतीय तपास यंत्रणांना मिळू नये, यासाठी पाकिस्ताननेही दुबई कोर्टात खोटी कागदपत्रे सादर करत देवडीवाला पाकिस्तानचा नागरिक असल्याचे म्हटले होते. यानंतर यूएई कोर्टाने देवडीवालाला पाकिस्तानच्या ताब्यात दिले होते.

फारुख देवडीवाला हा पाकिस्तानमध्ये असून त्याची हत्या करण्यात आल्याचे समजते. फारुखच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल केला जात असून व्हिडिओतील व्यक्ती फारुखच आहे का, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.