काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपला मतदारसंघ अमेठीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. परंतु, त्यांचा हा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी पोस्टरवरून सुरू झालेला वाद हा आज हाणामारीपर्यंत येऊन ठेपला. मंगळवारी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर कार्यकर्ते पांगले पण अनेकजण यात जखमी झाल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे अमेठीतील एका महाविद्यालयात राहुल गांधी उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला राग जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनात घोषणा दिल्या.
https://twitter.com/ANINewsUP/status/953175094704062464
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आगमनानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावली होती. यामध्ये राहुल गांधी देशात राम राज्य आणतील आणि भाजपाचे कुशासन संपवतील, असे म्हटले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाची उपमा दिली होती. यावर भाजपा नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता. राहुल गांधींनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी प्रदेशा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याचा विरोध करत आंदोलन केले. याचवेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते परस्परांत भिडले.
मंगळवारी राहुल यांना एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभाग व्हायचे होते. प्रथम राहुल हे तिथे येणार नसल्याचे वृत्त आले. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात आणि पंतप्रधान मोदींच्या समर्थनात घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी राहुल गांधी उशिरा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. तर गौरीगंज येथील राहुल यांच्या रॅलीत काही स्थानिकांनी काळे झेंडे दाखवत आपला विरोध दर्शवला. संपूर्ण दौऱ्यात राहुल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.