दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठांच्या निवडणुकांच्या निकालानंतर येथील वातावरण तापलं आहे. रविवारच्या निवडणूक निकालानंतर सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (आयसा) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. याप्रकरणी पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने बाहेरील लोकांना आत येण्याची परवानगी नाकारली आहे. विना ओळखपत्र विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यास बंदी घातलेली आहे. तसेच विद्यापीठात सुरक्षा रक्षकांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांकडून डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला, असा आरोप विद्यार्थी संघटनेचा नवनियुक्त अध्यक्ष एन. साई बालाजीने केला आहे. तर विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्षा गीता कुमारीच्या नेतृत्त्वात डाव्या संघटनाच्या कार्यकर्त्यांकडून अभाविप’च्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप अभाविपने केला आहे. दोन्ही गटांनी वसंत कुंज पोलिस स्टेशनमध्ये एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

रविवारी आलेल्या निकालांमध्ये डाव्या संघटनांनी अभाविपचा अक्षरशः धुव्वा उडवला आणि चारही जागांवर विजय मिळवला होता. त्यापूर्वी शनिवारपासूनच येथे तणावपूर्ण वातावरण होते. अभाविपने गोंधळ घातल्यामुळे येथे शनिवारी मतमोजणी थांबवण्यात आली होती, त्यावेळीही मतपेट्या चोरण्याचा प्रयत्न अभाविपने केला होता असा आरोप आहे. रविवारी निकाल आल्यापासून येथील वातावरण तापलेले आहे.