कोलकात्याच्या रस्त्यावर गुरुवारी भाजपा कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या भाजपाच्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेडस लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर या हिंसक संघर्षाला सुरुवात झाली. नाबान्ना म्हणजेच राज्य सचिवालयापर्यंत भाजपाने या मोर्चाचे आयोजन केले होते.

राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी दुपारी कोलकाता, हावडा येथून हजारो भाजपा कार्यकर्ते नाबान्नाच्या दिशेने निघाले. बंगाल पोलिसांनी हा मार्च वाटेत अडवला. भाजपा कार्यकर्ते बॅरिकेड हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान हिंसक संघर्षाला सुरुवात झाली. पोलिसांनी भाजपा  कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुरु केला. हावडा जिल्ह्यातील संत्रागच्ची येथे भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा जोरदार फवारा मारण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडण्यात आल्या.

“पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत होते. खिदीरपूरच्या बाजूने दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी ते पाहिले नाही का?” असा सवाल भाजपा नेते लॉकेट चटर्जी यांनी विचारला आहे. अनेक भाजपा नेते प्रदेश भाजपा उपाध्यक्ष राजू बॅनर्जी आणि खासदार ज्योर्तिमय सिंह माहातो जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर गोंधळाची स्थिती होती. भाजपा कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली असे इंडिया टुडेने म्हटले आहे. पक्षाने राजव्यापी आंदोलन पुकारले होते. हावडामध्ये रस्त्यावर टायर जाळण्यात आले.