ऑस्ट्रेलियामध्ये अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या एक तरूणाच्या सुटकेसाठी आता सरकारकडून प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असून, याप्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तर, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी देखील ऑस्ट्रेलियन दूतावासाला भारताच्या चिंतेबद्दल माहिती दिली व मुख्यमंत्री खट्टर यांना विश्वास दिला की लवकरच त्या तरूणाची सुटका होईल.

विशाल जुडच्या अटकेचा मुद्दा सध्या ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांमध्ये चांगलाच गाजत आहे. तसेच, हरियाणामध्ये देखील मागील काही दिवसांपासून सातत्याने विशाल जुडच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शनं केली जात आहेत. सोमवारी करनालमध्ये सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येत विशाल जुडच्या सुटकेच्या मागणीसाठी धर्मशाळा रोडवरून शेकडोंच्या संख्येने गांधी चौकापर्यंत तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांकडे निवेदन पाठवले गेले.

तर, विशाल जुडने सुटकेसाठी सरकारला साद घातली होती. विशालच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, देश विरोधी काही शक्तींनी विशालला मारहाण केली आणि नंतर ऑस्ट्रेलिया सरकारसोबत मिळून खोट्या केसमध्ये अडकवून त्याला तुरूंगात पाठवलं. असं देखील सांगितलं जात आहे की, विशालने ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत तिरंगा ध्वजाच्या सन्मानासाठी देशविरोधी शक्तींचा सामना केला व तिरंगा ध्वजाचा अपमान होऊ दिला नाही. विशालचे समर्थक ऑस्ट्रेलियात देखील निदर्शने करत आहेत.