आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देशम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोणत्याच विषयावर चर्चा झाली नसल्याची माहिती आंध्र प्रदेशचे संसदीय कार्यमंत्री वाय एस चौधरी यांनी दिली. टीडीपीच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खुलासा केला. त्याचबरोबर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरही बोलणं झालं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून टीडीपी भाजपावर नाराज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्वतंत्र लढण्याच्या निर्णयानंतर त्यांच्याकडूनही अशाप्रकारची घोषणा केली जाऊ शकते, असे माध्यमांत वृत्त येत होते. त्यातच अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद केली नसल्याची टीडीपीची भावना तीव्र झाली होती. त्या पार्श्वभूमीवर टीडीपीची आज संसदीय बैठक बोलावण्यात आली होती. तत्पूर्वीच चंद्राबाबू व ठाकरेंची चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांत आले होते.

केंद्र सरकारशी चर्चा केल्याप्रमाणे अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी काही तरतूद करण्यात आली नाही. त्याची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली, असे चौधरी यांनी सांगितले. आम्ही याबाबत केंद्र सरकारवर दबाव आणू, गरज पडली तर संसदेतही हा प्रश्न मांडू असा, इशाराही त्यांनी यावेळी दिला.

चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा, भाजपाची डोकेदुखी वाढणार?

तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना टीडीपीचे खासदार के. श्रीनिवास म्हणाले की, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी पक्षाच्या खासदारांशी विस्तृत चर्चा केली. आम्ही राज्याच्या विकासासाठी, नागरिकांच्या हितासाठी आणि राज्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी कार्यरत राहू. राज्यासाठी जे चांगले आहे, ती प्रत्येक गोष्ट टीडीपी करेल, असे ते म्हणाले.

आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातून शिवसेना आणि आंध्र प्रदेशातून तेलगू देशम जर एनडीएतून बाहेर पडले किंवा नाराज राहिले तर त्याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो. अशा पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती माध्यमांत आली होती. जर हे दोन नेते एकमेकांशी बोलले असतील तर भाजपासाठी ही चांगली बातमी नाही असेच म्हणावे लागेल. या दोघांची नाराजी दूर करणे हे आता भाजपासमोरचे आव्हान असू शकते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.