उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब यांच्या पाठोपाठ आता गुजरातमध्येही पद्मावती प्रदर्शित होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ही माहिती दिली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटावर राजपूत समाजाने आक्षेप घेतला आहे. पद्मावती चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा दावा करणी सेनेने केला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.

‘पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच हा चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही,’ असे रुपाणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. पुढील महिन्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल यांनीही ‘पद्मावती’ला विरोध केला होता. ‘चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग हटवायला हवेत. अन्यथा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते,’ असे रुपाणी यांनी म्हटले.

पद्मावती चित्रपटातून ऐतिहासिक घटना तोडूनमोडून दाखवण्यात आल्याचा आरोप राजपूत समाजाने केला आहे. चित्रपटातील पद्मावती ही व्यक्तीरेखा चित्तौडगढची राणी पद्मिनीसारखी असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाबद्दल रुपाणी यांनी ट्विट केले आहे. ‘राजपूत समाजाच्या भावना लक्षात घेऊन गुजरात सरकार पद्मावती चित्रपट राज्यात प्रदर्शित करण्याची परवानगी देणार नाही. इतिहास तोडूनमोडून तो लोकांसमोर सादर करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही. आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. मात्र त्या नावाखाली आमच्या महान संस्कृतीशी तडजोड होऊ शकत नाही. हे कदापि सहन केले जाणार नाही,’ असे रुपाणी यांनी ट्विटमध्ये म्हटले.