अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान ड्रग्ज प्रकरणाचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणी एनसीबीनं सुरू केलेल्या चौकशीत अनेक बड्या लोकांची नावं समोर आली होती. तसंच त्यांचे चॅटही व्हायरल झाले होते. दरम्यान, यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या एन्ड टू एन्ड इन्क्रिप्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. तसंच बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीला जुने संदेश मिळवण्यात यश मिळालं आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यादरम्यान व्हॉट्सअ‍ॅपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरी संदेश सुरक्षित असून ते कोणत्याही तिसर्या व्यक्तीला पाहता येऊ शकत नाहीत म्हणजेच कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीपर्यंत हे संदेश पोहोचू शकत नाहीत, असं व्हॉट्सअ‍ॅपनं म्हटलं आहे.

“एन्ड टू एन्ड इनक्रिप्शनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप आपले संदेश सुरक्षित ठेवत आहे. तसंच हे संदेश दोन व्यक्तींमध्येच सुरक्षित असतात. ज्यानं संदेश पाठवला आहे त्याला आणि ज्याला संदेश पाठवला आहे त्यालाच हे संदेश वाचता येतात. युझर्स केवळ फोन नंबरच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर साईनअप करतात आणि व्हॉट्सअ‍ॅपची तुमच्या संदेशापर्यंत पोहोच नाही,” अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

“ऑन स्टोरेज डिव्हाईससाठी व्हॉट्सअ‍ॅप ऑपरेटिंग सिस्टम तयार करणाऱ्यांद्वारे आखण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करत.. आम्ही कायमच बायोमॅट्रिक आयडी. पासवर्ड अशा सर्व सुरक्षा उपायांचा वापर करण्याचा सल्ला देतो. जेणेकरून युझर्सच्या संदेशांपर्यंत कोणत्याही तिसऱ्या पक्षाचं डिव्हाईस पोहोचलं जाणार नाही,” असंही त्यांनी नूद केलं. २००५ पासून मोबाईल फोन क्लोनिंगचा तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकांचे संदेश मिळवले गेल्याचं अनेकांचं मत आहे. क्लोन फोनला व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप अॅक्सेस करणं शक्य असून इनक्रिप्टेड नसलेल्या ड्राईव्हनाही अॅक्सेस करता येणं शक्य आहे. ड्रग्ज प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारावर अनेकांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.