बिहारमधील सीतमढी जिल्ह्यातील सुरसंद परिसरामध्ये चांदीचा पाऊस पडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती. बुधवारी सकाळी या परिसरातील लोक जेव्हा सकाळी रस्त्यावर आले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या परिसरातील रस्त्यावर चांदीचे छोटे छोटे शेकडो बंदुच्या आकाराचे गोळे स्थानिकांना अढळून आले. सुरसंद येथील टॉवर चौकापासून ते बाराही गावापर्यंतच्या मार्गावर चांदी पडली होती. त्यामुळेच या परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास चांदीचा पाऊस पडल्याची चर्चा पंचक्रोषीमध्ये वाऱ्यासारखी पसरली.

ही बातमी समजल्यानंतर रस्त्यावर पडलेले चांदीचे गोळे वेचण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. चांदीचे छोटे छोटे गोळे जमा करुन लोक घरी नेताना दिसत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरसंदमधील रस्त्यांवर चांदी कुठून आली असा प्रश्न अनेकजण एकमेकांना विचारत होते. नेपाळच्या सीमेला लागून असणाऱ्या या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात चांदीची तस्करी केली जाते. तस्कर गोण्यांमधून चांदी घेऊन जाताना एखादी गोणी फाटल्याने ही चांदी रस्त्यावर पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

असं असलं तरी दिवसभर या परिसरामध्ये आकाशातून पडलेल्या चांदीच्या पावसाची चर्चा सुरु राहिली. स्थानिक चोर किंवा तस्कर या मार्गाने चांदीच्या मोठ्या गोणी घेऊन जात असताना एखादी गोणी फाटल्याने रस्त्यावर चांदीच्या गोळ्यांचा सडा पडला असावा असं म्हटलं जातं आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सुरसंद पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मात्र ही चांदी नक्की कुठून आली याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र असा प्रकार या परिसरामध्ये पहिल्यांदाच घडल्याचं स्थानिक सांगतात.