देशभरात आपल्या जादूच्या प्रयोगांनी लोकांना आश्चर्यचकित करणारे जादूगार आनंद सध्या अडचणीत सापडले आहेत. ४ मे रोजी जादूगार आनंद यांचा इंदोर येथील रवींद्र नाट्यगृहात जादूचा प्रयोग होता. यावेळी त्यांनी स्टेजवरुन हत्ती गायब करण्याची करामत करुन दाखवली होती. इंदोरमधील प्राणीमित्र संघटनेने आनंद यांचा हा प्रयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचं सांगत आणि प्राणी हिंसा असल्याचं सांगत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आता याप्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

इंदोरमधील रवींद्र नाट्यगृहात सध्या आनंद आपले मॅजिक शो सादर करत आहेत. आनंद येथे दिवसभरात एकूण तीन शो करतात. या शोचं महत्वाचं आकर्षण असतं ते म्हणजे स्टेजवरुन हत्ती गायब करणे. यासाठी आनंद यांनी इंदोरचे माहूत रामेश्वर यांच्या हत्तीण रजनीला भाड्याने घेतलं आहे. हत्तीण आजारी असतानाही तिच्याकडून काम करवून घेतलं जात असल्याचा आरोप आहे.

इंदोरच्या प्राणीमित्र संघटनेला जेव्हा हत्ती रजनीच्या प्रकृतीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी वनविभागाकडे यासंबंधी तक्रार केली. हत्तीची पाहणी करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आनंद यांच्या कार्यक्रमात गेले होते. यावेळी आनंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवत अधिकाऱ्यांना परत पाठवलं. आदेश पाहिल्यानंतर अधिकारीही कारवाई न करताच परतले. आता मात्र प्राणीमित्र संघटनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

न्यायालयात धाव घेणाऱ्या प्रियांशू जैन यांनी सांगितलं आहे की, “प्रकृती योग्य नसतानाही हत्तीणीचा जादूच्या प्रयोगासाठी उपयोग करुन घेणं क्रूरता आहे. तिच्यावर उपचार करुन जंगलात सोडून दिलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने १९९० मध्ये जंगली जनावरांचा सर्कसमध्ये वापर करण्यावर बंदी आणली होती. चित्रपटांमध्येही जनावरांच्या वापरासंबंधी कडक नियम आहेत”. दरम्यान याप्रकरणी २४ मे रोजी सुनावणी होणार आहे.