जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश खजुरिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर (POK) हा पाकिस्तानचा भाग असून तो पाकिस्तानपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य फारूख अब्दुल्ला यांनी केले होते. तर अभिनेते ऋषी कपूर यांनी ही वादग्रस्त भूमिका मान्य करत फारूख अब्दुल्ला यांना समर्थन दिले. इतकेच नाही तर ‘जम्मू काश्मीर आपला आहे आणि पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा आहे. मृत्यूपूर्वी मला एकदा पाकिस्तान बघायचा आहे’ असेही ट्विट ऋषी कपूर यांनी केले होते. याच वक्तव्यांप्रकरणी या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जम्मू काश्मीरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. कलम १९६ अंतर्गत या दोघां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे वादग्रस्त भूमिका मांडणारे फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे समर्थन करणारे ऋषी कपूर या दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी मागील शनिवारी पाकव्याप्त काश्मीरबाबत पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. एवढेच नाही तर दोन्ही देशांमधील काश्मीर जनतेला स्वायत्तता देण्याची गरज आहे असेही अब्दुल्ला यांनी म्हटले होते.

फारूख अब्दुल्ला यांच्या भूमिका ट्विटरवरून पूर्ण पाठिंबा देत तुमची भूमिका पूर्णपणे योग्य असून मला मरणापूर्वी पाकिस्तान बघायचा आहे अशी इच्छा ऋषी कपूर यांनी व्यक्त केली. या प्रकरणी आता जम्मू काश्मीरचे सामाजिक कार्यकर्ते सुकेश खजुरिया यांनी तक्रार दाखल केली आहे.