स्थानिक संस्था कराच्या मुद्दय़ावरून राज्यात व्यापारी विरुद्ध सरकार असा संघर्ष निर्माण झाला असून त्यात जनतेचे हाल होत असल्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निर्देश देऊन या मुद्दय़ावर सन्माननीय तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसच्या खासदारांनी गुरुवारी सोनिया गांधी यांच्याकडे केली.
या मुद्दय़ावर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले.  काँग्रेस सरचिटणीस खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह गुरुदास कामत, दत्ता मेघे, जयवंत आवळे, एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई यांच्या शिष्टमंडळाने सोनिया गांधी यांची भेट घेऊन १८ खासदारांच्या सहय़ांचे निवेदन दिले. व्यापारी विरुद्ध सरकार या संघर्षांत हजारो कामगारांचे हाल होत आहेत. या मुद्दय़ावरून काँग्रेसचे खासदार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या अजिबात विरोधात नसून जकात कराचे मुळीच समर्थन करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना फटका बसू नये म्हणून लवकरात लवकर सन्माननीय तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांना निर्देश देण्याची मागणी त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली.