जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी आणि या संस्थांतील लोकप्रतिनिधींना व सरपंचांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस राज्य सरकारवर दबाव निर्माण करेल, असे आश्वासन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी दिले. राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर राज्याच्या दौऱयावर आले आहेत. दौऱयाच्या सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेस पक्षातर्फे निवडून आलेल्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ७३ वी घटनादुरुस्ती जम्मू-काश्मीरमध्ये अंमलात आणली जाईल. तुम्हाला तुमचे अधिकार मिळतील. तुमच्यासाठी मी राज्य सरकारशी लढेन. त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेन. 
राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच एका लोकप्रतिनिधीने आम्हाला राज्य सरकारकडून काहीच मिळाले नाही. जे काही मिळाले ते केंद्र सरकारकडूनच, असे सांगत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याला शांत बसण्यास सांगतानाच राहुल गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना सशक्त केले जाईल, असे सांगितले.