बंडखोरांच्या अपात्रतेची मागणी; काँग्रेसचे शिवकुमार आज मुंबईत

कर्नाटकात राजकीय नाटय़ सुरूच आहे. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी कॉंग्रेसने मंगळवारी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे केली. तर सत्ताधारी पक्षांतील १३ बंडखोर आमदारांपैकी आठ जणांनी सादर केलेले राजीनामे विहित नमुन्यात नसल्याने त्यांना पुन्हा राजीनामा पत्र पाठविण्याचे निर्देश रमेशकुमार यांनी दिले. दरम्यान, बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार बुधवारी मुंबईत येणार आहेत.

सत्ताधारी काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींना आणखी वेग आला. कॉंग्रेसचे आणखी एक आमदार आर. रोशन बेग यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांची भेट घेऊन पक्षांतरबंदी कायद्यान्वये बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली.

दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी गेल्या आठवडय़ात राजीनामा दिलेल्या १३ पैकी आठ जणांची राजीनामा पत्रे विहित नमुन्यात नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे त्यांना पुन्हा राजीनामा पत्रे पाठविण्याचे निर्देश रमेशकुमार यांनी दिले. पाच आमदारांची राजीनामा पत्रे योग्य, विहित नमुन्यात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात आनंद सिंग, नारायण गौडा, प्रताप गौडा पाटील, गोपालय्या आणि रामलिंग रेड्डी यांचा समावेश आहे.

बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेता यावे आणि त्यांची नाराजी दूर व्हावी यासाठी सर्व मंत्र्यांनी राजीनामे देऊन मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. बंडखोर आमदार महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. काँग्रेसने त्यांना अपात्र ठरविण्याच्या हालचाली केल्या असल्या तरी राजीनामे मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे या बंडखोरांचे म्हणणे आहे.

राजीनामा सादर करून मुंबईत दाखल झालेल्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार बुधवारी मुंबईत येणार आहेत. शिवकुमार हे कॉंग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. भाजपने बंडखोर आमदारांना पूर्ण बंदोबस्तात ठेवले असल्याने शिवकुमार यांना आमदारांची भेट घेणे शक्य होणार नाही, अशी चिन्हे आहेत. शिवकुमार मुंबईत दाखल होण्यापूर्वीच या आमदारांना पणजीत हलविले जाण्याची शक्यता आहे.