29 May 2020

News Flash

राहुल सक्रिय; काँग्रेस निश्चिंत

लोकसभा निवडणुकीत दणाणून आपटल्यानंतर चिंतेत असलेल्या काँग्रेस नेत्या-कार्यकर्त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्यात पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सक्रियतेमुळे हायसे वाटू लागले आहे.

| May 14, 2015 05:33 am

लोकसभा निवडणुकीत दणाणून आपटल्यानंतर चिंतेत असलेल्या काँग्रेस नेत्या-कार्यकर्त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्यात पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सक्रियतेमुळे हायसे वाटू लागले आहे. विरोधी बाकांवरील काँग्रेसच्या अवघ्या ४४ खासदारांमध्ये राहुल गांधी यांच्या सक्रियतेमुळे उत्साह संचारला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोदी सरकारला ‘सूट बूट की सरकार’ असे हिणवणाऱ्या राहुल गांधी यांनी लोकसभेत पाचपेक्षाही जास्त वेळा विविध मुद्दे उपस्थित केले. सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या राहुल गांधी पहिल्यांदाच एकाच अधिवेशनात सर्वाधिक वेळा बोलले आहेत. प्रामुख्याने विविध स्तरातील लोकांच्या प्रश्नांवर राहुल यांनी सरकारला जाब विचारला.
तब्बल पन्नासपेक्षाही जास्त दिवस अज्ञातवासात सुट्टी उपभोगण्यासाठी गेलेले राहुल संसदेत अत्यंक आक्रमक स्वरूपात अवतरले. नेट न्यूट्रलिटी, पंजाबमधील बाजारात पडून राहिलेला गहू, अमेठीतील फूड पार्क, जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या विषयांवर राहुल गांधी संसदेत बोलले. त्यांच्या भाषणातील मुद्दे खोडून काढण्यात सरकारला यश आले असले तरी राहुल यांना अत्यंत योजनापूर्वक संसदीय कामकाजात पुढे आणले जात आहे. विरोधी बाकांवर बसल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. विरोधी बाकांवर असल्याने संघटनात्मक मान्यतेसाठी राहुल गांधी संसदेत वारंवार विविध मुद्दय़ांवर सरकारला जाब विचारत आहेत.  त्यांच्या भाषणादरम्यान काँग्रेसची यूथ बिग्रेडचे नेते त्यांचा उत्साह वाढविताना दिसले. विरोधी बाकांवर बसल्यानंतर सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन सतत चर्चेत राहण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. राहुल गांधी यांच्या अमेठी फूड पार्कवरील भाषणानंतर सलग पाच वेळा सरकारने स्पष्टीकरण दिले. अमेठीमधील फूड पार्क काँग्रेसच्याच काळात गुंडाळण्यात आल्याची वस्तुस्थिती सरकारकडून मांडण्यात आले. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी दोन वेळा, राजनाथ सिंह यांनी एकदा स्पष्टीकरण दिले. तर भाजप खा. किरिट सोमय्या यांनी दोनदा राहुल गांधी यांचा दावा खोटा ठरवणारी माहिती सभागृहात मांडली. त्यातून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे अनेकदा कामकाज तहकूब झाले व काँग्रेसची रणनीती यशस्वी झाली.
राहुल गांधी यांनी सभागृहात शेतकरी, नेट न्यूट्रलिटीवरून युवक, स्थावर मालमत्ता विधेयकावरून मध्यमवर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे भाजपला आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे भाग पडले. संसद व संसदेबाहेर राहुल गांधी सक्रिय झाल्याने काँग्रेस नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
रणदीप सुर्जेवाला, काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2015 5:33 am

Web Title: congress happy as rahul takes responsibility
Next Stories
1 ‘नमामी गंगे’ प्रकल्पाला केंद्राची मान्यता
2 चीनकडून १२५ कोटी भारतीय जनतेचा सन्मान- नरेंद्र मोदी
3 किरकोळ क्षेत्रात ५१ टक्के परकीय गुंतवणुकीस मंजुरी
Just Now!
X