जेएमएम ४३, काँग्रेस ३१ आणि आरजेडी ७

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीचे जागावाटप शुक्रवारी जाहीर झाले. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)४३, काँग्रेस ३१ आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ७ जागा लढवणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि झारखंड निवडणूक प्रमुख आर पी एन सिंह यांनी पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा केली. या वेळी त्यांच्या सोबत झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन हेही उपस्थित होते, राष्ट्रीय जनता दलाचे नेते मात्र या वेळी गैरहजर होते. तथापि, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतरच जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे आर पी एन सिंह यांनी स्पष्ट केले. आमची आघाडी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवण्यात येईल आणि हेमंत सोरेन हे आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे सिंह यांनी सांगितले. एकाही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सिंह यांनी दिला.

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा २० डिसेंबरला होईल आणि २३ डिसेंबरला मतमोजणी होईल. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवण्यात येईल आणि हेमंत सोरेन हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील.– आर पी एन सिंह, प्रवक्ते, काँग्रेस