काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटवरविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे. सिंह यांनी केलेलं एक ट्विट ट्विटरने नियमांचे कारण देत डिलीट केलं आहे. यासंदर्भात सिंह यांनी ट्विट करुन नाराजी व्यक्त केली आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विटरने पाठवलेल्या नोटीफिकेशनचा फोटो पोस्ट करत यासंदर्भात ट्विट केलं आहे. “ट्विटरकडून मी केलेले ट्विट ब्लॉक केले जात आहे. हे ट्विट संवेदनशील असल्याचे सांगत हे हटवण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये काय संवेदनशील आहे हे मला सांगण्यात आलं नाही. मला भारतातील ट्विटरच्या प्रमुखांनी याचे उत्तर द्यावे,” अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

इतकेच नाही दिग्विजय सिंह यांनी ट्विटरने केलेल्या कारवाईना निषेध व्यक्त करताना माझ्यासारखी जबाबदार व्यक्ती आक्षेपार्ह ट्विट का करेल असा प्रश्नच उपस्थित केला आहे. “मी एक जबाबदार भारतीय नागरीक आहे. मी पाचवेळा मध्य प्रदेश विधानसभेमध्ये आणि प्रत्येकी दोनवेळा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निवडून गेलो आहे. मी मध्य प्रदेशमध्ये मंत्रीही होतो. मी १० वर्ष मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री होतो. मी आक्षेपार्ह ट्विट का करेन?”, असं दिग्विजय यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात बोलणं म्हणजे संवेदनशील आहे का असा प्रश्न विचारला आहे. “मी जर नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्या विरोधात काही बोललो आणि ते तुम्हाला संवेदनशील वाटत असेल तर तुम्ही राजकीय भेदभाव करत आहात. याआधीही मी तुमच्या या भेदभावासंदर्भात व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, मात्र मला काहीच उत्तर देण्यात आलं नाही,” असंही दिग्वविजय यांनी म्हटलं आहे.

दिग्विजय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ट्विटर काही स्पष्टीकरण देणार का यासंदर्भात येत्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल.