काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे स्पष्टीकरण; संयुक्त राष्ट्रांत जाण्याची आझम खान यांची उठाठेव
दादरी प्रकरणानंतर गोमांस बंदीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेले असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी, सरकारने देशात गोवंश हत्या बंदी करणारा कायदा आणल्यास त्याला काँग्रेस पक्ष पाठिंबा देण्याचा विचार करील, असे म्हटले आहे. दरम्यान, जातीय सलोख्याचा संदेश देण्यासाठी काँग्रेसने दादरीमध्ये एक दिवस उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील २४ राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा असल्याचे आणि काँग्रेस सत्तेवर असताना तो जारी करण्यात आल्याचे भाजपला ज्ञात हवे. काँग्रेस कार्यकारी समितीने १९३०च्या दशकात गोवंश हत्या बंदी करण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता.
आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठीच भाजपने हा प्रश्न उचलून धरला आहे. काँग्रेसनेच अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्येवर बंदी घातली आहे हे भाजपने समजून घ्यावयास हवे. दरम्यान, सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देण्यासाठी दादरी तहसीलमध्ये १० ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वतीने सद्भावना उपोषण केले जाईल असे पक्षनेते मधुसुदन मिस्त्री यांनी सांगितले.
वातावरण तापले
उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांकडे नेणार असल्याचे सांगून अकलेचे तारे तोडले आहेत. तर वादग्रस्त भाजप आमदार संगीत सोम यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, जवळच्या एका खेडय़ात मांसाचे तुकडे सापडल्याने तणाव वाढल्यामुळे प्रशासनाने येथे लोकांच्या येण्यावर प्रतिबंध घातले आहेत. दादरी येथील हत्या ‘पूर्वनियोजित’ होती आणि ती भाजपने घडवून आणली, असा आरोप आझम खान यांनी केला. रा. स्व. संघ धार्मिक आधारावर विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.