करोना महामारीमुळे मध्यमवर्गीय अडचणीत सापडला असल्याचं सांगत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी खासगी हॉस्पिटल अवास्तव पैसे आकारु नयेत, तसंच व्यापाऱ्यांनाही दिलासादायक निर्णय घेण्यात यावे अशा मागण्या केल्या आहेत.

या पत्रात प्रियांका म्हणतात, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे. त्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागत आहे. आणि प्रशासनाची तयारी आणि नियोजन नसल्याने हे होत आहे. त्या म्हणाल्या, की एप्रिल मे या दोन महिन्यांमध्ये प्रशासनाचं ढिसाळ नियोजन समोर आलं. या काळात अनेक अनावश्यक नियम आणि त्यामुळे सर्वसामान्यांना सहन करावा लागणारा त्रास याचं दर्शन घडलं.

प्रियांका उत्तरप्रदेशसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत. एका बाजूला ही महामारी आपल्या जवळची माणसं आपल्यापासून हिरावून नेत आहे तर दुसरीकडे उदरनिर्वाह, रोजगार, जगण्यासाठीचे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत, असंही प्रियांका म्हणाल्या.

Video : करोनाला पळवण्यासाठी भाजपा नेते यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर

लोकांना कर्ज काढून, आपली बचत खर्च करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देणारी पावलं प्रशासनाने उचलायला हवीत, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शाळा बंद असूनही पालकांना भरमसाठ फी भरावी लागत आहे. तर शाळांनाही तोटा सहन करुन शिक्षकांचे पगार द्यावे लागत आहेत. त्यामुळे शिक्षक तसंच शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करुन या प्रश्नावर तोडगा काढण्याचाही सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.

आणखी वाचा- ‘तुमच्या राज्यातल्या लोकांवर लक्ष द्या’; योगींना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला!

विजेचे दर कमी करुन वीजबिलात सूट कशी देता येईल जेणेकरुन सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत, याबद्दलही विचार करण्यास प्रियांका यांनी सांगितलं आहे.