काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर गेल्या काही दिवसांपासून टीका करत आहेत. कृषी कायद्यांवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्राने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्यासोबत धान्याला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी शेतकरी आग्रही आहेत. यावरून गेल्या काही महिन्यात दिल्लीतलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.

शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चेची दार खुली ठेवली आहेत. मात्र कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही. आता राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. ‘सरळ सरळ आहे. आम्ही सत्याग्रही अन्नदात्यासोबत आहोत’, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यासोबत FarmersProtest असा हॅशटॅगही दिला आहे.

दुसरीकडे दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनात जीव ओतण्याचा प्रयत्न केला. पंजाबमधून हजारो शेतकरी मोहाली मार्गे चंदीगडला पोहोचले. तर हरयाणातील शेतकऱ्यांनी पंचकूला मार्गे चंदीगडमध्ये प्रवेश केला. यानंतर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्ते शेतकरी चंदीगडमध्ये जवळपास ६ ते ७ किमी आतमध्ये घुसले. मात्र पोलिसांनी राजभवनजवळ त्यांना रोखलं. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले. तर पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. या दरम्यान काही शेतकरी जखमीही झाले.