केरळ विधानसभेत सोमवारी पिनारायी विजयन यांच्या डाव्या आघाडी सरकारविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्तलोकशाही आघाडीने अविश्वास ठराव मांडल्यानंतर पिनारायी यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. “कॉंग्रेसची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे बरेचसे काँग्रेसचे अनेक नेते भाजपाकडून आमंत्रण येण्याची वाट बघत आहेत. काँग्रेस पक्ष स्वतःचे नेतृत्व ठरवू शकत नाही, तर दुसरीकडे त्यांचेच नेते एकमेकांवर भाजपाचा एजंट असल्याचे आरोप करत आहेत. काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना भाजपात जायचे आहे, फक्त ते भाजपाकडून बोलवण्याची वाट पाहत आहेत,” असा दावा पिनारायी यांनी केला आहे.

आणखी वाचा- ‘या’ काँग्रेस नेत्याच्या घरी डिनरदरम्यान झाली हायकमांडला पत्र पाठवण्याची प्लॅनिंग

काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादावर पिनारायी यांनी निशाणा साधला आहे. नेतृत्वावरून पक्षात सध्या दोन गट पडले आहेत. काँग्रेस कार्यसमितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. मात्र, हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय सात तासांच्या वादळी चर्चेनंतर घेण्यात आला. करोनास्थिती निवळल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाणार असून, त्यात नव्या अध्यक्षाची निवड होईल असे ठरवण्यात आले आहे.

आणखी वाचा- कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य; म्हणाले…

केरळ विधानसभेत बहुमत सिद्ध करताना मुख्यमंत्री पिनारायी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. एकीकडे काँग्रेसने इकडे अविश्वास ठराव मांडला आहे तर दुसरीकडे दिल्लीत एक अविश्वास ठराव मांडला आहे. तिथे यांचे नेते एकमेकांना भाजपाचे एजंट असल्याचे म्हणत असल्याची टीका पिनारायी यांनी केली आहे.