मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रचार सुरु झाला आहे. भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करु लागले आहेत. दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका करताना मध्य प्रदेशात आपला नेता कोण आहे ? हे काँग्रेसने सांगावं…ना त्यांच्याकडे नेता आहे, ना राज्यासाठी एखादं धोरण आहे अशी टीका केली आहे. शहाजहापूर येथे प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘आम्ही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार आहोत. पण मला काँग्रेस पक्षाला विचारायचं आहे की, त्यांचा मध्य प्रदेशात नेता कोण आहे ? त्यांच्याकडे ना नेता आहे, ना राज्यासाठी एखादं धोरण आहे’, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेश काँग्रेसने आपला निवडणूक जाहारीनामा प्रसिद्ध केला आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन काँग्रेसने जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकांवर बोनस आणि प्रत्येक ग्रामपंचायतीत गोशाळा स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने या ११२ पानी जाहीरनाम्याला वचन पत्र असे नाव दिले आहे.

शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत देण्याचाही काँग्रेसने शब्द दिला आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल ५० टक्क्याने कमी करु. डिझेल, पेट्रोलचे दरही कमी करु अशी आश्वासने काँग्रेसने दिली आहेत. गायींसाठी अभयारण्ये स्थापन करण्याबरोबरच गोशाळेत गोमूत्रापासून व्यावसायिक उत्पादने सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.

निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत आणि कोऑपरेटीव्ह बँकेकडून घेतलेले २ लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गहू, सोयाबीन, मूग, चणा, कांदा आणि ऊस या पिकांवर बोनस देण्याचाही शब्द देण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबातील एका बेरोजगार सदस्याला तीन वर्षांपासाठी १० हजार रुपये बेरोजगार भत्ता, मुलीच्या लग्नाच्यावेळी ५१ हजार रुपये तसेच भूमिहिन नागरिकांना घर बांधणीसाठी 2.5 लाख रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.