इंडिया बेट्रेड पुस्तिकेचे प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसची टीका

नरेंद्र मोदी व अमित शहा ही जोडगोळी देशाला हानिकारक असल्याचे लोकांना त्यांच्या गेल्या चार वर्षांतील राजवटीत कळून चुकले आहे, हा सगळा काळ विश्वासघात, लबाडी, सूड व खोटारडेपणा यात गेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. इंडिया बेट्रेड या पुस्तिकेचे प्रकाशन मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारकीर्दीची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी करण्यात आले. या वेळी मोदी सरकारवर हल्ला चढवताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत व रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले, की राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात द्वेष व भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

मोदी व अमित शहा ही जोडगोळी देशाला घातक आहे. चार वर्षांत मोदी सरकारने लोकांना विश्वासघात, लबाडी, सूड व खोटारडेपणा या गोष्टींची ओळख करून दिली आहे,असे काँग्रेसचे प्रवक्ते सूरजेवाला यांनी सांगितले.

दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व महिला यांच्यावरील अत्याचाराचा उल्लेख करताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले, की भारतात भाजप सरकारच्या राजवटीत कुणीच सुरक्षित नाही. कुणालाच रात्री सुखाची झोप नाही. संयुक्त पत्रकार परिषदेत अशोक गेहलोत यांनी सांगितले, की देशात भीती, द्वेष व हिंसेचे वातावरण गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने तयार केले आहे.

काँग्रेसने इंडिया बेट्रेड ही पुस्तिका प्रकाशित करून भाजपच्या चार वर्षांतील गैरराजवटीवर हल्ला बोल केले आहे. हिंदूी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून ही पुस्तिका असून त्यात पंतप्रधान मोदी यांना चाळीस प्रश्न विचारण्यात आले आहेत. देशातील सध्याच्या घबराट व भीतीच्या वातावरणावर एक लघुपटही जारी करण्यात आला आहे. महिला काँग्रेसच्या नेत्या सुश्मिता देव यांनी सांगितले, की मोदी सरकारच्या राजवटीत महिला सुरक्षित नाहीत. युवक काँग्रेसचे प्रमुख केशव यादव यांनी युवकांना रोजगाराच्या संधी नसल्याने सगळीकडे त्यांना अंधारच दिसत असल्याची टीका केली आहे.