काँग्रेसला धर्माच्या आधारावर निवडणुका लढवायच्या आहेत असा आरोप केंद्रीय निर्मला सीतारामण यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे जाणीवपूर्वक मुस्लिम बुद्धीजिवींच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेसला निवडणुका लढण्यासाठी मुस्लिम आणि दलित यांच्या मतांचा आधार आवश्यक आहे. बिहारमध्ये काँग्रेसला यादव मतांचीही गरज आहे त्यामुळे २०१९ च्या निवडणुकाही काँग्रेस धर्माच्या आधारावर लढवणार आहे त्यांच्या पुढचा हाच अजेंडा आहे असा आरोप निर्मला सीतारामण यांनी केला आहे.

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर भाजपा निवडून आल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल असे म्हणतात. तर दिग्विजय सिंग हे भारतातील सत्ताधाऱ्यांची तुलना पाकिस्तानच्या जिया उल हकसोबत करतात. या सगळ्यातून काँग्रेसला काय साध्य करायचे आहे? आमच्यावर कट्टर असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो मात्र धर्माचे कार्ड निवडणुकांसाठी खेळायचे हा काँग्रेसचा छुपा हेतू आहे असेही सीतारामण यांनी म्हटले आहे.

कर्नाटकचे अल्पसंख्याक मंत्री संपूर्ण देशात शरियत न्यायलये असली पाहिजेत असे म्हणतात. राहुल गांधी यांनी मध्यंतरी मुस्लिम समाजाची माफी मागत आम्ही भरकटलो होतो असे म्हटले तसेच त्याचमुळे आम्ही २०१४ च्या निवडणुका हरलो असेही म्हटले होते. यावरून काँग्रेसला मुस्लिम समाजाला आणि दलितांना जवळ करायचे आहे ही बाब उघड होते आहे असेही सीतारामण यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा पक्ष मुस्लिमांसाठी आहे का? यावर राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी निर्मला सीतारामण यांनी केली.

तसेच येत्या काळात जर धार्मिक भावना दुखावणाऱ्या काही अप्रिय घटना घडल्या तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे काँग्रेसची असेल असेही निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी मुस्लिम समाजातील बुद्धीजिवींशी जी चर्चा केली ती सार्वजनिकपणे मांडावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. निर्मला सीतारामण यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.