भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची स्तुती केल्यानंतर काँग्रेसने त्याची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधानपदासाठीच्या नावांवरून भाजपमध्ये संघर्ष पेटल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी ट्विट केले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्लीत भाजपच्या बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीशी तुलना करताना चौहान यांनी मागास असलेल्या मध्य प्रदेशचा चेहरामोहरा बदलला असे कौतुक केले. गुजरात मुळात प्रगत होता तो प्रगतीचा वेग तुम्ही राखला असे आपण मोदींना सांगितल्याचे अडवाणी  म्हणाले. त्याच मुद्दय़ावरून  तिवारींनी भाजपवर टीका केली आहे.
अडवाणी यांनी शनिवारी बोलताना चौहान यांची तुलना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी केली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी विकासाच्या अनेक योजना राबवल्या पण ते नम्र राहिले हे सांगताना अडवाणींनी शिवराज सिंह चौहान यांचे कौतुक केले. मध्य प्रदेशमध्ये विकास कामे राबवताना चौहान यांनी अहंभाव कधी येऊ दिला नाही. अडवाणी यांच्या तुलनेमुळे मोदींना आणखी एक स्पर्धक वाढल्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने टीकेची संधी सोडली नाही. भाजपमध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदारांची संख्या वाढत असून संघ विरुद्ध भाजप असाच संघर्ष पेटल्याची टिप्पणी मनीष तिवारी यांनी केली आहे.