काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे किंवा त्यांच्या एखाद्या कृतीमुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सचा आवडीचा विषय ठरलेले असतात. मग ती त्यांची संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोळा मारण्याची कृती असो किंवा मग प्रचारसभांमधून त्यांनी केलेले दावे असोत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी मत्स्यव्यवसाय विभागासंदर्भात केलेलं वक्तव्य ट्रोलर्सकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. यावर आता स्वत: राहुल गांधींनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

१७ फेब्रुवारी रोजी राहुल गांधींनी पुद्दुचेरीमध्ये काही मच्छिमारांशी बोलताना हे वक्तव्य केलं होतं. ‘देशाचे शेतकरी दिल्लीजवळ आंदोलन करत आहेत. तुम्ही देखील समुद्रातले शेतकरी आहात. तुम्ही माशांची शेती करता. जर जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्रात वेगळं मंत्रीपद आणि खातं असू शकतं, तर समुद्रात शेती करणाऱ्या तुम्हा मच्छिमारांसाठीही केंद्रात स्वतंत्र खातं असायला हवं’, असं राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांना नेटिझन्सकडून आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपकडून देखील ट्रोल केलं गेलं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील गुरुवारी पुद्दुचेरीमध्ये बोलताना राहुल गांधींच्या या वक्तव्यावर खोचक टीका केली होती. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी विभागाचे मंत्री गिरीराज सिंह यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती. त्यावरून आता राहुल गांधींनी आपल्याला काय म्हणायचं होतं, याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

 

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी गुरुवारी केलेल्या ट्वीटमध्ये आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. ‘प्रिय पंतप्रधान महोदय, देशातल्या मच्छीमारांना पूर्णपणे स्वतंत्र मंत्रालय हवं आहे, एखाद्या मंत्रालयातला एक विभाग नकोय’, असं राहुल गांधींनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच, खाली खोचक टोमणा मारताना, ‘हम दो हमारे दो’ना वाईट वाटलंच असणार’ असं देखील ते म्हणाले आहेत.

 

राहुल गांधींच्या या ट्वीटनंतर काँग्रेस पक्षातील इतरही नेतेमंडळींनी आणि काँग्रेस पक्षाच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवरून या मुद्द्यावर अशाच आशयाचा मजकूर टाकायला सुरुवात केली आहे.