शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नुकतीच वायनाडमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच वायनाडमधील 8 हजार शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम न भरल्याचे सांगत बँकेने नोटीस पाठवली. तसेच अनेकांच्या जमिनी जप्त करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. केरळमध्ये बँकांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर गेल्या दीड वर्षांमध्ये 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने 5.5 लाख कोटी रूपयांचे मोठ्या व्यावसायिकांचे कर्ज माफ केले. दरम्यान, सरकार अशी दुहेरी भूमिका का घेत आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. तसेच शेतकऱ्यांना केरळ सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ पोहोचवण्यातही बाधा येत असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून बँकांनी त्रास देऊ नये, यावरदेखील सरकारने लक्ष द्यावे, असेही राहुल यावेळी म्हणाले. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर देत काँग्रेसला धारेवर धरले.

सध्या देशातील शेतकऱ्यांची जी दयनीय स्थिती आहे ती आतापासून नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी सरकार चालवले त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांची दयनीय स्थिती झाल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहे. अनेक पिकांचे हमीभाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 20 ते 22 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यातही 6 हजार रूपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे ते म्हणाले.