वस्तू आणि सेवा कर कायद्याचे (जीएसटी) मध्यरात्री समारंभपूर्वक उद्घाटन केले म्हणजे त्याची अंमलबजावणी आपोआप होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटले होते. मात्र, जीएसटीची अंमलबजावणी ही एक मोठी प्रक्रिया असून त्यामध्ये इतरांशी चर्चा करावी लागते. ही प्रक्रिया म्हणजे उत्क्रांतीसारखी आहे. मात्र, मोदींना ही गोष्ट न उमगल्यामुळे त्यांनी जीएसटी लागू करण्याची घाई केली, असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. ते बुधवारी सुरतमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि मोदी सरकारची कामगिरी आदी मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी यावेळी म्हटले की, सरकारने लागू केलेल्या जीएसटीच्या प्रारूपाशी आम्ही सहमत नाही. हे प्रारूप चूक असल्याचे मोदींनाही कालांतराने लक्षात आले. त्यामुळे मोदी आता जीएसटीच्या निर्णयात काँग्रेसचाही समावेश असल्याचे सांगत आहेत.

यावेळी राहुल गांधी यांनी रोजगार निर्माण करण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशाचा मुद्दाही अधोरेखित केला. जगात चीन आणि भारत या दोन देशांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे २१व्या शतकात भारताची स्पर्धा ही पाश्चात्य देशांशी नसून चीनशी आहे. ही स्पर्धा अर्थव्यवस्थेच्या पातळीवर आहे. चीनमध्ये एका दिवसात ५० हजार रोजगार उपलब्ध होतात तर भारतात हेच प्रमाण दिवसाला ४५० इतके आहे. याशिवाय, भारतीय बाजारपेठेत चिनी उत्पादने स्थानिक उत्पादनांसाठी मोठी स्पर्धा निर्माण करत आहेत. मात्र, आज मला सुरतमध्ये लघू आणि मध्यम उद्योगाची बाजारपेठ पाहिल्यानंतर आपण चीनशी नक्कीच सक्षमपणे स्पर्धा करू, असा विश्वास वाटला. भारतीय अर्थव्यवस्था सात ते आठ टक्क्यांनी वाढत असली तरी रोजगार ही देशातील प्रमुख समस्या आहे. त्यामुळे भारताने यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात मध्यम आणि लघू उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून तब्बल ५० टक्के रोजगार निर्माण होतात. सध्या सरकार काही निवडक उद्योगपतींना शक्य ती मदत करत आहे. याच्या १५ टक्के मदत मध्यम आणि लघू उद्योगांना केली तर या क्षेत्राचा कायापालट होईल, असे राहुल यांनी सांगितले. काँग्रेसच्या काळातही निवडक उद्योगपतींकडे लक्ष पुरवले गेले. मध्यम आणि लघू उद्योगांना फारशी मदत झाली नाही, हे मी कबूल करतो. यापूर्वी माझी स्वत:ची विचारपद्धतीही वेगळी होती. सुरूवातीला फक्त गरिबांना मदत करावी, यावर माझा भर असायचा. मात्र, आता माझा कल संपूर्ण यंत्रणेत समतोल साधण्याकडे आहे. जेणेकरून प्रत्येकाला व्यवस्थेबद्दल आणि सरकारबद्दल विश्वास वाटेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.