चीनचा सामना करणं तर सोडूनच द्या मात्र त्या देशाचं नाव घेण्याचं धाडसही पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही टीका केली आहे. संरक्षण मंत्रालयाने चीनने घुसखोरी केल्याची कागदपत्रं वेबसाइटवरुन हटवली आहेत असाही आरोप केला आहे. याआधी गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने अधिकृत वेबसाइटवर काही कागदपत्रं अपलोड केली होती. यामध्ये लडाख भागात मे महिन्यात चीन सैन्याने घुसखोरी केल्याचे मान्यही केलं होतं. मात्र नंतर ही कागदपत्रं हटवण्यात आली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. चीनने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे. आपले सैन्य सीमेवर लढत आहे. मात्र सरकारची वक्तव्यं भ्रम पसरवणारी आहेत. आयटीबीटी या भागातून मागे हटतं आहे, मात्र चिनी सैन्य जैसे थे आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या जमिनीवर कुणीही घुसखोरी केली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेली घुसखोरीची माहिती हटवली. संरक्षण मंत्रालय मोदींचा बचाव करतं आहे का? असा प्रश्नही अजय माकन यांनी विचारला आहे. तसंच यासाठीच्या चर्चेवर अधिवेशन बोलवण्याची मागणीही केली.