कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्यापही संपलेलं नाहीये. बहुमत सिद्ध करण्यापुर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बहुमत चाचणी होण्यापुर्वी झालेली ही निवड जेडीएस-काँग्रेससाठी मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे.

कुमारस्वामी यांच्यासाठी बहुमत चाचणी अत्यंत महत्वाची आहे. याआधी त्यांनी ११७ आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. यासोबतच जेडीएस आणि काँग्रेसमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलं होतं. दरम्यान बहुमत चाचणीआधी काँग्रेसच्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. जेडीएसला पाच वर्ष समर्थन देण्यासंबंधी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “अद्याप समर्थनाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायचं बाकी आहे. सध्या बहुमत चाचणी पार पाडणं आणि चांगलं काम करणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे”.