पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. पुलवामा हल्ल्याच्या आठवडयाभरानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्याचवेळी पंतप्रधान नरेद्र मोदी उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते.

जगात तुम्ही असा पंतप्रधान कुठे पाहिला आहेत का? माझ्याकडे खरोखर बोलण्यासाठी शब्द नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्याला गांर्भीयाने घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला. या हल्ल्यावरुन भारतीय जनता पार्टी राजकारणही करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नरेंद्र मोदींना राजधर्माचा विसर पडला असून ते सत्ता वाचवण्याच्या मागे लागले आहेत. शहीदांच्या सन्मानापेक्षा नरेंद्र मोदींना सत्तेची लालसा जास्त आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आसामच्या सभेत पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन राजकारण केले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही कारण आता केंद्रात काँग्रेसचे नाही भाजपाचे सरकार आहे असे सांगून त्यांनी या मुद्दावरुन राजकारणाचा प्रयत्न केला असा आरोप काँग्रेसने केला. भाजपाला दहशतवादावरुन राजकारण करण्याची घाणेरडी सवय आहे असा आरोप काँग्रेसने केला.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर पोहोचले त्यावेळी मोदींनी तिथे यायला एक तास विलंब केला कारण झांसीमध्ये ते राजकारणात व्यस्त होता असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला. पूलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्ययात्रेत काही भाजपा नेत्यांनी केलेले वर्तन लाजिरवाणे होते असे सांगत सूरजेवाला यांनी ते फोटो दाखवले.