काँग्रेस पक्षाने कायमस्वरुपी अध्यक्ष निवडण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत पक्षाचे नेते शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष दिशाहीन असल्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी कायमस्वरुपी अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला पक्षाने वेग देण्याची गरज असल्याचं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “पक्षाचं नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे क्षमता आणि योग्यता आहे. मात्र जर त्यांना अध्यक्ष होण्याची इच्छा नसेल तर पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची गरज आहे,” असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

शशी थरुर यांनी यावेळी राहुल गांधींच्या कामाचं कौतुकही केलं. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चुकीचे निर्णय तसंत करोना स्थिती हाताळण्यावरुन जबाबदार धरत चांगलंच धारेवर धरल्याचं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी १० ऑगस्ट २०१९ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती.

आणखी वाचा- “राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल, तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा”

“आपल्याला लोकांचा काँग्रेस पक्षाबद्दल असलेला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. काही प्रसारमाध्यमांमुळे काँग्रेस पक्ष दिशाहीन असल्याचा समज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. सोबतच विरोधी पक्ष म्हणून आव्हान स्वीकारण्यास असमर्थ असल्याचंही लोकांना वाटू लागलं आहे,” असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. सर्वात जुना पक्षा असणाऱ्या काँग्रेसकडे स्पष्ट नेतृत्त्व असलं पाहिजे असं शशी थरुर यांनी सांगितलं आहे. “सोनिया गांधी यांनी अनिश्चित काळासाठी पक्षाचं नेतृत्त्व घेण्याची अपेक्षा करणं त्यांच्यावर ओझं टाकल्यासारखं आहे,” असंही शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “भाजपा सरकार देशातील साधन संपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी काय करत आलीये”

“मला वाटतं काँग्रेस पक्षाने आपल्या भविष्यातील नेतृत्त्वासंबंधी स्पष्ट असलं पाहिजे. गतवर्षी सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर मी स्वागत केलं होतं. पण हे ओझं त्यांनी कायमचं आपल्या खांद्यावर घेण्याची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल,” असं स्पष्ट मत शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे.