देशाच्या विरोधातील घोषणाबाजी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते का, असा सवाल उपस्थित करत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) भेटीवर टीका केली. ‘राहुल यांनी ‘जेएनयू‘ला भेट दिली, याची काँग्रेसला लाज वाटायला हवी‘ असे अमित शहा म्हणाले. ते आज उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका बैठकीत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, देशात विचित्र वातावरण तयार केले जात आहे. देशविरोधी घोषणा म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे भासविले जात आहे. अशावेळी राहुल गांधी जेएनयूला भेट देतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ‘अशा घोषणा ऐकल्या पाहिजेत‘ असे सल्ले देतात. सोनिया गांधी या सगळ्याशी सहमत आहेत का? या घोषणांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे झाले तर, मग देशद्रोह कशाला म्हणायचे, हे सोनियांनी सांगावे, अशी मागणी शहा यांनी केली.