News Flash

काँग्रेसची पराभवांची मालिका खंडित

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाच राज्यांचा निकाल काँग्रेससाठी नक्कीच उपयुक्त ठरणारा आहे.

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.

संतोष प्रधान

लोकसभा निवडणुकीपूर्वी उपांत्य फेरीचा (सेमी फायनल) समजला जाणारा  पाच राज्यांच्या निवडणुकांचा सामना ३-२ असा जिंकल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उपांत्य फेरीत भाजपला एकही राज्य जिंकता आले नाही याचे काँग्रेसला तर अधिकच समाधान. लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या पराभवाची जणू काही मालिकाच सुरू झाली होती. पंजाबमधील एकहाती विजयाचा अपवाद वगळल्यास पूर्ण बहुमत कुठेच मिळाले नव्हते. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या मदतीने सत्ता कायम राखली असली तरी एकहाती सत्ता कायम राखता आली नव्हती. केंद्रशासित पुण्डेचरीत द्रमुकच्या मदतीने सत्ता मिळाली. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा भाजपचा नारा प्रत्यक्षात येऊ लागला होता. काँग्रेस म्हणजे पराभव हे जणू काही समीकरण झाले. भाजपबरोबर थेट लढती झालेल्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या पदरी गेली साडेचार वर्षे पराभवच आले होते.

गेल्या वर्षी गुजरात विधानसभा निवडणुकांपासून चित्र काहीसे बदलत गेले. काँग्रेसने आपल्या पारंपरिक धोरणांमध्ये काही बदल केले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारापूर्वी राहुल गांधी यांनी त्या राज्यात विविध मंदिरांना भेटी देऊन सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार केला. गुजरातमध्ये पटेल समाजाच्या नाराजीचा फायदा उठविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातची सत्ता कायम राखली असली तरी भाजपचे संख्याबळ घटले. गेल्या वर्षी १६ डिसेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील दरबारी राजकारणी किंवा दुढ्ढाचार्याना दूर करीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास सुरुवात केली. याचाही फायदा झाला. राहुल गांधी हे आधी आघाडी किंवा मित्र पक्षांना महत्त्व देण्यास फारसे तयार नसत. पण भाजपशी सामना करण्याकरिता मित्र पक्षांची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली. कर्नाटकात सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला सत्तेपासून रोखण्याकरिता काँग्रेसने संपूर्ण निकाल हाती येण्यापूर्वीच धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा दिला. आघाडीची आवश्यकता लक्षात घेता नवे मित्र जोडण्यावर भर दिला.

राफेल विमान खरेदीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेत मोदी यांच्यावर टीका केल्यावर भाषणाच्या अखेरीस मोदी यांच्या आसनापाशी जाऊन त्यांना मिठी मारली होती. आपण कोणाचा द्वेष वा मत्सर करीत नाही हा संदेश त्यांना द्यायचा होता. या मिठीवरून राहुल गांधी यांच्यावर टीकाही बरीच झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाल्याशिवाय लोकसभेत खैर नाही हे लक्षात घेऊनच काँग्रेसने नियोजन केले. नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका आणि शेतकरी वर्गातील संतप्त भावनेला वाट करून दिली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वत्र मोदी यांनाच लक्ष्य केले. मध्य प्रदेशात गुजरातच्या धर्तीवरच मंदिरांना भेटी, आपण जानवेधारी ब्राह्मण असल्याचे सांगतानाच गोत्राचा केलेला उल्लेख यातून हिंदुत्वाचा पुरस्कार केला. मध्य प्रदेशच्या जाहीरनाम्यात गोमूत्र, गोशाळा आदी मुद्दे घेत हिंदू मतदारांना आकर्षित केले. मध्य प्रदेशमध्ये माळवा किंवा अन्य काही भागांमध्ये हिंदुत्वाला पोषक वातावरण असल्याने याच मुद्दय़ावर भर देण्यात आला.

मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये पक्षांतर्गत नेतृत्वाचा वाद होता. मध्य प्रदेशात कमलनाथ विरुद्ध ज्योतिरादित्य सिंदिया, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट अशी सरळसरळ विभागणी होती. मुख्यमंत्रीपदासाठी एकाचे नाव पुढे केल्यास दुसरा नेता खो घालणार ही शक्यता होती. यामुळेच मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा पुढे न आणता गेहलोत, पायलट, कमलनाथ, सिंदिया यांच्यात समन्वय साधण्याची तारेवरची कसरत राहुल गांधी यांना करावी लागली.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाले आहे. कोणताही प्रभावी नेता नसतानाही भाजप किंवा मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या विरोधातील नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला. राजस्थानमध्ये आलटून-पालटून सत्ताबदल होण्याची परंपरा असून, हा कल कायम राहिला आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने चांगली लढत दिली. मिझोरामची सत्ता मात्र काँग्रेसला गमवावी लागली. ईशान्य भारतात आता एकही राज्य काँग्रेसच्या हाती राहिलेले नाही. ईशान्य भारतातील शेवटच्या राज्यातील सत्ता गेली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाच राज्यांचा निकाल काँग्रेससाठी नक्कीच उपयुक्त ठरणारा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषक पट्टय़ातील तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६५ जागा असून गेल्या वेळी भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत हाच कल कायम राहणे कठीण आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र आल्यास चित्र नक्कीच बदलू शकते. लोकसभेच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निकालांवरून कल समजू शकतो. पाच राज्यांच्या उपांत्य फेरीत विजय मिळाल्याने लोकसभेच्या अंतिम फेरीसाठी काँग्रेसचा आत्मविश्वास नक्कीच बळावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2018 2:55 am

Web Title: congress won assembly election in three state
Next Stories
1 मध्य प्रदेशातील काँग्रेसचे रणनीतीकार
2 छत्तीसगड : हाताला दलित, आदिवासी, ओबीसींची साथ
3 मिझोरममध्ये काँग्रेसचा धुव्वा, ‘एमएनएफ’कडे सत्ता
Just Now!
X