स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीच्या मुद्दय़ावर अंतिम निर्णय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत होणार आहे. काँग्रेसच्या कोअर ग्रुपने स्वतंत्र तेलंगणाविषयी चर्चा केल्यानंतर हा विषय काँग्रेसचे सर्वोच्च व्यासपीठ ठरलेल्या कार्यकारिणीकडे सोपविण्याचे ठरविले, अशी माहिती आंध्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रभारी सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी कोअर समितीची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस कोअर ग्रुपच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीविषयी चर्चा झाली, पण निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. स्वतंत्र तेलंगणाविषयी सहमतीसाठी आणखी वेळ हवा असून हा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी सर्व राजकीय पक्षांशी सल्लामसलत झाली असून आज कोअर ग्रुपसमोर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही आपले मत मांडले, असे दिग्विजय सिंह म्हणाले.
स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीबद्दल काँग्रेसश्रेष्ठींनी अनुकूलता दाखवली आहे. कोअर ग्रुपच्या बैठकीपूर्वी किरणकुमार रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीबद्दल काँग्रेसश्रेष्ठींनी अनुकूलता दाखवली असून चालू महिन्याअखेर तेलंगणाच्या निर्मितीविषयी निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पण हा मुद्दा अतिशय गुंतागुंतीचा असल्यामुळे त्यावर आणखी चर्चा व्हावी, असा आग्रह धरला जात आहे. तेलंगणा समर्थक नेत्यांना स्वतंत्र तेलंगणाच हवा आहे, रायलसीमा आणि किनारपट्टीनजीकच्या क्षेत्रातील नेत्यांचा स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.