तृणमूल काँग्रेसच्या कार्यकत्र्यांचा छळ करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कारस्थान रचत असल्याचा आरोप मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोग शहा यांच्या सूचनेनुसार काम करीत आहे का, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला.

शहा यांच्या सभांना अपेक्षित गर्दी होत नसल्याने ते निराश झाले आहेत, भाजप आपली हत्या करण्याचा कट रचत आहे, असा आरोपही ममतांनी केला. नंदिग्राममध्ये ममतांना दुखापत झाल्यानंतर ममता यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांची निवडणूक आयोगाने उचलबांगडी केली. या ‘हल्ल्या’च्या संदर्भाने ममता म्हणाल्या की, भाजपविरुद्धचा लढा सुरू ठेवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.

सभांना गर्दी कमी होत असल्याने शहा निराश झाले आहेत, देशाचा कारभार करण्याऐवजी ते कोलकातामध्ये ठाण मांडून बसले असून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकत्र्यांचा छळ करण्याचे कारस्थान रचत आहेत, त्यांना काय हवे आहे, त्यांना आपली हत्या करावयाची आहे का, आपली हत्या करून ही निवडणूर्क ंजकू असे त्यांना वाटते का, तसे वाटत असल्यास ती त्यांची चूक आहे, असे ममता एका सभेत म्हणाल्या.

निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आहे का, असा सवाल करून बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग शहा यांच्या सूचनेनुसार काम करीत असल्याचा आरोप केला.

स्वपन दासगुप्ता यांचा राज्यसभेचा राजीनामा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्याने  राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दासगुप्ता यांना २५ एप्रिल २०१६ रोजी भाजपने राज्यसभेवर नियुक्त केले होते. आता त्यांना तारकेश्वार विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. दासगुप्ता यांना भाजपनेपश्चिम बंगालमधील उमेदवारी दिली असतानाही ते राज्यसभेत खासदार आहेत यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आक्षेप घेतला होता. मोईत्रा यांनी असे म्हटले होते की, राज्यसभेच्या परिशिष्ट १० मध्ये म्हटल्यानुसार शपथ घेतल्यापासून कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास त्या व्यक्तीची राज्यसभा सदस्य म्हणून पात्रता सहा महिन्यांत संपुष्टात येते. दासगुप्ता यांनी एप्रिल २०१६ मध्ये राज्यसभेची शपथ घेतली होती. तेव्हा ते कुठल्या पक्षात नव्हते पण आता त्यांनी भाजपत प्रवेश केला असल्याने राजीनामा द्यावा. भाजपचा उमेदवारी अर्ज भरला तर ते राज्यघटनेच्या परिशिष्ट १० अनुसार अपात्र ठरतात.