गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकी व्हिसा देऊ नये, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना खासदारांनी पत्र लिहिण्याच्या विषयावरून बुधवारी वेगळेच वादळ उठले. अनेक खासदारांनी आपण अशा कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचे स्पष्ट केल्याने या पत्रावर खासदारांच्या बनावट स्वाक्षऱया करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी, द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार के. पी. रामलिंगम, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार एम. पी. अचुतन यांनी आपण अशा कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचे खासदार सुदर्शन भगत यांनी मीरा कुमार यांना पत्र लिहून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. हा खूप गंभीर आणि फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण केली असल्याचे भगत यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाचेच हे कारस्थान असल्याची टीकाही भाजपने केली.